एमटीएनलच्या इमारतीची आग विझवण्यात यश

85 जणांना सुखरूप बाहेर काढले

मुंबई – वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कंपनीच्या नऊ मजली इमारतीला सोमवारी दुपारी आग लागली होती. यावेळी इमारतीतील एसीने पेट घेतल्याने संपूर्ण इमारत धुराने वेढली गेली होती. यावेळी इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्या 85 अधिकारी, कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुखरूप खाली उतरवले. तर, आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा जवान जखमी झाला आहे.

दुपारी दोनच्या सुमारास इमारतीच्या लेखा विभागातील वातानुकूलन उपकरणाने पेट घेतला. या विभागातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी अग्निशामक उपकरणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकली. वीज वाहिन्यांसह लाकडी साहित्य आणि कागदपत्रांनी पेट घेतला आणि नोंदणी विभागातही आग पसरत गेली.

काही वेळाने आग पसरून धुराचे लोट खिडक्‍यांद्वारे बाहेर पडू लागले. पायऱ्या, लिफ्टमधून धूर वरच्या मजल्यांवर पसरला. त्यामुळे चार ते नऊ माजल्यांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गच्चीत धाव घेतली. परंतु वरच्या मजल्यावरील सुमारे 100 कर्मचारी गच्चीत अडकून पडले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा फौजफाटा इमारतीजवळ पोचला त्यांनी अद्ययावत शिडया लावून गच्चीत अडकलेल्यांसाठी बचावकार्य सुरू केले. तर दुसऱ्या पथकाने इमारतीच्या आत शिरून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 16 गाडया, दोन जेटी, सात पाण्याचे टॅंकर, 10 अग्निशमन दलाच्या रुग्णवाहिका आणि प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यासह 175 कर्मचारी बचाव कार्यात सहभागी झाले होते. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 60 ते 70 जणांना गच्चीवरून सुखरूप खाली उतरवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या प्रयत्नात अग्निशमन दलाचे जवान सागर साळवे गुदमरले. त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)