नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा
निगडी – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. शासनाने मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने परीक्षाही रद्द करण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष संपून गेले, असे असले तरीही प्रथम सत्रात विद्यार्थ्यांचे झालेले मूल्यमापन आणि घेतलेल्या परीक्षेच्या आधारे प्रगती कशी आहे यावरून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय झाला आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे इयत्ता 1ली ते इ. 8वी च्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊ शकले नाही, तसेच इ. 9 वी आणि इ. 11वी या वर्गांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या, मात्र पहिल्या सत्रात झालेले मूल्यमापन आणि परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरून निकाल बनविण्यात आले आहेत. ते निकाल आणि प्रगतीपुस्तिका विद्यार्थी आणि पालकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक आणि निकाल वाटप केले जाणार आहे.
मुलांना सध्या सोशल मीडिया आणि विविध मोबाइल ऍपच्या माध्यमातून घरीच स्व-अभ्यास दिला जात आहे. तसेच पुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची जुनी पुस्तके वापरून अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. शाळा सुरू होताच शासनाच्या वतीने मिळणारी मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे नियोजन केले जाणार आहे.
शैक्षणिक प्रवेशासाठी ऑनलाइन फॉर्म
जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्यासाठी पाल्याचे पुढील वर्षात प्रवेश निश्चित करण्यासाठी शाळांनी पहिल्या टप्प्यात ऑनलाइन फॉर्मची सुविधा सुरू केली आहे. पालकांनी मोबाइलवरून हा फॉर्म भरावा, असे आवाहन संस्थाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
शाळा बंद मात्र शिक्षण सुरू
लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत इ.1ली ते 10वी साठी सहशालेय विविध उपक्रम पालकांसाठी व विद्यार्थ्यांच्या कृतीसाठी अभ्यासाच्या लिंक तयार केल्या आहेत. कल, हस्तकला, स्पोकन इंग्लिश, संगणक विज्ञान, नाटक, मजेत शिकू, 5वी शिष्यवृत्ती, 8वी गणित, आता कचरा नाही आदी उपक्रम दिले आहेत. तसेच बालभारतीने सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहेत. तसेच नवीन अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ उपलब्ध करून दिले आहेत. शाळेतील अध्यापकांनी व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून शिक्षण चालू ठेवले आहे. शाळांनी व शासनाने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतली आहे.
15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा प्रयत्न
शासनाचा 15 जूनला सर्व शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. परंतु शाळा सुरू होण्यासाठी आणखी किती दिवस लागणार याबाबत साशंकता आहे. कारण करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे कितपत शक्य होणार आहे याबाबत प्रश्नचिन्ह आहे. इयत्ता 9वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. पुनर्परीक्षेचे वेळापत्रक शाळा सुरू झाल्यावरच संबंधित विद्यार्थी आणि पालकांना कळविण्यात येणार आहे.