नवी दिल्ली – केंद्र सरकारी कार्यालयांच्या आवारात थुंकणे हा आता दंडनीय अपराध ठरवण्यात आला आहे. पर्सोनेल विभागाने त्या विषयीची अधिसूचना जारी केली आहे.
देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालयांसाठी ती लागू राहणार आहे. या आदेशामुळे सरकारी व खासगी कार्यालयांच्या आवारात पान किंवा गुटखा खाऊन थुंकण्याच्या प्रकारांना आता आळा बसेल असे मानले जात आहे. हाच आदेश गृहमंत्रालयानेही रिपीट केला असून त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही तो लागू केला आहे.
सर्व कामाची ठिकाणे आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणेही बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व कार्यालयांनी शक्यतो वर्क फ्रॉम होम या तत्त्वाचे शक्य तितक्या अधिक प्रमाणात पालन केले पाहिजे, असेही यात सांगण्यात आले आहे. सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर हॅंड वॉश, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग अशा सुविधाही तैनात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कार्यालये आणि सार्वजनिक वापराची सारी ठिकाणी वारंवार सॅनिटाईज्ड केली जावीत, असेही गृहमंत्रालयाच्या सूचनेत म्हटले आहे.