पुणे – कोल्हापूर व कोकण भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील सातारा, कराड, सांगली व कोल्हापूर या भागांत जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक अतिशय संथ झाल्याने विस्कळीत झाली आहे. यामुळे, स्वारगेट स्थानकातून कोल्हापूर, सांगली शहर व जिल्ह्यात जाणाऱ्या 40 एस.टी. बस रद्द केल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे सातारा ते कोल्हापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीवरील दोन समांतर पुलांपैकी एक पाण्याखाली गेला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर व सांगलीला जाणाऱ्या बस बंद केल्या आहेत.
कोल्हापूर शहरातील नदीला आलेल्या पुराने सातारा व कराड पोलीस प्रशासनाने कोल्हापूरला जाणारी बहुतांशी वाहतूक थांबविली आहे. यामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या एस.टी. बस अडकून पडण्याची शक्यता असल्याने सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत.
– प्रदीपकुमार कांबळे, आगारप्रमुख, स्वारगेट