पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज सलग तिसरी आणि महापौर राहुल जाधव यांच्या कार्यकाळातील 18वी सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली आहे. वारंवार वेगवेगळी कारणे देऊन सभा तहकूब करण्याचा सपाटा सुरू असल्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनीही आज संताप व्यक्त केला.
महापालिकेची गत तहकूब सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. दुपारी 1 वाजता झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. सभा सुरू होताच गणसंख्येचे कारण देत आजची सभा तहकूब केली. भाजपाच्या कार्यकाळातील आजची 42 वी सभा तहकूब करण्यात आली. यापूर्वीचे महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकाळात 24 सभा तहकूब करण्यात आल्या होत्या. तर राहुल जाधव यांच्या काळात आजच्या सभेसह 18 सभा तहकूब करण्यात
आल्या आहेत.
आजच्या सभा तहकुबीला उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आक्षेप घेत सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर दिला. तर इतरही भाजपाच्या नगरसेवकांनी राहुल जाधव यांच्या सभा तहकुबीवर नाराजी व्यक्त केली. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका मंगला कदम, माजी महापौर अपर्णा डोके यांनीही सभा तहकुबीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच शहरातील प्रश्नांचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप केला.