करोनाच्या पार्श्वभूमीवर बाल निरीक्षण गृह अधीक्षक पडघन यांची माहिती
पुणे / येरवडा – करोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रार्श्वभूमीवर बालसुधारगृहामध्येही काळजी घेतली जात आहे. येथील मुलांना करोनासंदर्भात माहिती देण्यात येऊन खबरदारी कशी घ्यायची, याची कल्पना देण्यात आली आहे. तसेच आरोग्य खात्याच्या सूचनांनूसार येथे योग्य ती दक्षता घेण्यात आल्याची माहिती येरवडा येथील बाल निरीक्षण गृह आणि विशेष गृह अधीक्षक जी. एन. पडघन यांनी दिली.
जिल्हा बाल निरीक्षण गृहामध्ये विधिसंघर्षीत बालकांना न्यायालयाच्या आदेशानुसार ठेवण्यात येते. येथे सध्या 32 बालके आहेत. पुण्यामध्येही करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी संस्था तसेच शासकीय संस्थांमध्ये योग्य ती काळजी घेतली जात आहे.
आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. खरबदारी म्हणून त्याचे सर्वांनी पालन करायचे आहे. तसेच शासकीय संस्थांना सॅनिटायझर आणि मास्कसाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
बाल सुधारगृहातही सॅनिटायझर आणि हॅन्डवॉशचा वापर केला जात आहे. कर्मचाऱ्यांबरोबरच बालकांनाही ते उपलब्ध करुन दिले गेले आहे. बालकांना यासंदर्भात योग्य ती माहिती देण्यात आली आहे. हात कसे स्वच्छ धुवायचे, याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाने एखादे नवीन बालक दाखल झाल्यास त्याची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यानंतर त्याला वेगळे ठेवण्यात येत आहे. सध्या बालकांना वेगवेगळे ठेवण्यात प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच एखादा बालक आजारी वाटल्यास वैद्यकीय सल्ला घेण्यात येत आहे.
पालकांनाही सूचना देऊन सध्या तरी भेटायला येऊ नका, असे कळवण्यात आले आहे. बालकांना समुपदेशन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
शासनाकडून 31 मार्चपर्यंत गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.