T20 World Cup 2024, Team New Zealand : आगामी T20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. स्फोटक T20 क्रिकेट फलंदाज कॉलिन मुनरोने ( Colin Munro ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टी-20 विश्वचषकाच्या संघात निवड न झाल्याने त्याने हा निर्णय घेतला. मुनरोने 2020 पासून किवी संघासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो शेवटचा भारताविरुद्ध खेळताना दिसला होता. मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 हून अधिक धावा केल्या आहेत.
मुनरो ( Colin Munro ) गेल्या चार वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसला आहे. जगभरातील सर्व T20 लीगमध्ये तो आपल्या बॅटने स्फोटक फलंदाजी करताना दिसतो. मात्र, आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. मात्र तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी नुकतीच पुष्टी केली की मुनरोची T20 विश्वचषकासाठी निवड करण्याबाबत विचार करण्यात आला होता.
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मुनरो झालो भावूक…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर ब्लॅक कॅप्सचा स्टार क्रिकेटर म्हणाला, ” ब्लॅक कॅप्स (न्यूझीलंड) साठी खेळणे ही माझ्या क्रीडा कारकिर्दीतील नेहमीच सर्वात मोठी उपलब्धी आहे. न्यूझीलंडची जर्सी घालताना मला अभिमान वाटला आहे आणि मी 123 वेळा ही जर्सी घालू शकलो, ज्याचा तर मला अत्यंत अभिमान आहे. मी शेवटचं संघाकडून खेळलो, त्याला बराच वेळ झाला असला, तरी मी आशा सोडली नव्हती की मी माझ्या टी20 फ्रँचायझी फॉर्ममुळे पुनरागमन करेल. मात्र, टी20 विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा झाल्यानंतर आता अधिकृतरित्या थांबण्याची वेळ आली आहे.’
मुनरोची कारकीर्द…
या खेळाडूच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर मुनरोने ( Colin Munro ) किवी संघासाठी एक कसोटी, 57 एकदिवसीय आणि 65 टी-20 सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे 15, 1 हजार 271 आणि 1 हजार 724 धावा केल्या आहेत. मुनरोच्या नावावर T20 क्रिकेटमध्ये तीन शतके आणि 11 अर्धशतके आहेत. विशेष म्हणजे तो टी-20 क्रिकेट प्रकारात तीन शतके करणारा सर्वात पहिला क्रिकेटपटू आहे. मुनरोने गोलंदाजीतही प्रावीण्य दाखवले आहे. त्याने दोन कसोटी, सात एकदिवसीय आणि चार टी-20 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या विक्रमाबदल बोलायचे झाले तर त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 47 चेंडूत शतक केले होते. हे त्यावेळी न्यूझीलंडकडून केलेलं सर्वात जलद शतक होते. त्याचबरोबर 2016 साली श्रीलंकेविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले होते. हे आंतरराष्ट्रीय टी20 मधील न्यूझीलंडकडून केलेले सर्वात जलद अर्धशतक आहे. हा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे.
टीम इंडियाविरुद्ध केली होती स्फोटक खेळी….
मुनरोने टीम इंडियाविरुद्ध स्फोटक खेळी खेळली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिका खेळली गेली होती. त्याचा दुसरा सामना राजकोट येथे झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. यादरम्यान मुनरोने 58 चेंडूत नाबाद 109 धावा केल्या होत्या. त्याने 7 चौकार आणि 7 षटकार मारले. न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला केवळ 156 धावा करता आल्या. या सामन्यात टीम इंडियाला 40 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
न्यूझीलंडचा T20 विश्वचषक संघ
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी.