सेऊल (दक्षिण कोरिया) – दक्षिण कोरियाने देशांतर्गन बनवलेल्या रॉकेटची आज घेतलेली पहिली चाचणी अपयशी झाली. या रॉकेटच्या माध्यमातून एक बनावट उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार होता. मात्र या रॉकेटची चाचणी अपयशी ठरल्यामुळे दक्षिण कोरियाच्या अंतराळ कार्यक्रमाला सुरुवातीलाच धक्का बसला आहे.
“केएसएलव्ही-2′ असे या रॉकेटचे नाव होते आणि ते “नूरी’ या नावानेही ओळखले जात होते. अवकाशात सोडल्यावर निर्धारित 700 किलोमीटरवर पोहोचल्यावर या रॉकेटला जोडलेला 1.5 टन वजनाचा डमी उपग्रह नियोजित ठिकाणी स्थिरस्थावर केला जाऊ शकला नाही. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी दक्षिण किनारपट्टीजवळच्या गोहेन या गावातील नारो स्पेस सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
“चाचणी पूर्ण झाली याचा आपल्याला अभिमान वाटतो आहे. मात्र अपेक्षित परिणाम साधता येऊ शकला नाही, याचा खेद वाटतो आहे.’ असे ते म्हणाले. या अपयशामुळे अंतराळ विज्ञानातील आव्हाने अधोरेखित झाली आहेत. अंतराळ कार्यक्रमासाठी स्पेस लॉंच व्हेईकल टेक्नोलॉजी मिळवण्याचा प्रयत्न दक्षिण कोरिया दशकभरापासून करत आहे. आतापर्यंत रशिया, अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान आणि भारताने ही स्पेस लॉंच व्हेईकल टेक्नोलॉजी विकसित करण्यात यश मिळवले आहे.