सेऊल, (दक्षिण कोरिया) – दक्षिण कोरियामध्ये संप केलेल्या डॉक्टरांना काम पुन्हा सुरू होण्यासाठी गुरुवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर या मुदतीमध्ये हे डॉक्टर कामावर पुन्हा रुजू झाले, तर त्यांना शिक्षा केली जाणार नाही.
मात्र जर ते या मुदतीत पुन्हा कामावर हजर झाले नाहीत, तर त्यांना निलंबित करून त्यांचा वैद्ययकीय परवाना रद्द केला जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशांची संख्या ६५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या निर्णयाला विरोध करण्यासाठी ९ हजार प्रशिक्षणार्थी आणि निवासी डॉक्टरांनी गेल्या आठवड्यापासून संप सुरू केला आहे. या संपामुळे अनेक रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली असून शेकडो शस्त्रक्रीया देखील रद्द केल्या गेल्या आहेत.
देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अपुरी पडत असल्याने ही संख्या वाढवणे गरजेचे आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारच्या दोन आदेशांनंतरही डॉक्टरांनी सेवा सुरू केली नाही,
तर ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ३० दशलक्ष वोन (२२,४८० डॉलर) इतक्या दंडासह वैद्यकीय परवाना रद्द करण्याची तरतूद दक्षिण कोरियाच्या कायद्यामध्ये आहे.