मॉस्को – भारतीय प्रतिनिधींनी आज अफगाणिस्तानमधील तालिबानच्या हंगामी सरकारचा उपपंतप्रधान अब्दुल सालेम हनाफ याच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरिय शिष्टमंडळाची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील विपन्नावस्थेमुळे त्या देशाला मानवतावादी भूमिकेतून मदत देण्याची तयारी भारतीय प्रतिनिधींनी दर्शवली.
भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतऋत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण विभागातील सह आयुक्त जे.पी.सिंह यांनी केले. अफगाणिस्तानमधील समस्येबोबत चर्चा करण्यासाठी रशियाने बोलावलेल्या औपचारिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हे प्रतिनिधी मंडळ मॉस्कोला गेले आहे. मुख्य परिषदेच्या निमित्ताने भारतीय प्रतिनिधींनी तालिबानच्या शिष्टमंडळाची भेट घेतली, असे तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्ला मुजाहिद याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र केंद्र सरकारच्यावतीने यासंदर्भात कोणतेही निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलेले नाही.
भारतीय प्रतिनिधींनी यापूर्वी 31 ऑगस्टला तालिबानच्या प्रतिनिधींची अनौपचारिक भेट घेतली होती. मात्र आज झालेली भेट खऱ्या र्थाने औपचारिक होती. कारण तालिबानने गेल्या महिन्यात आपल्या हंगामी मंत्रिमंडळाची घोषणा केल्यानंतर ही भेट झाली असल्यामुळे ही भेट अधिकृत ठरली आहे.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत रशियाने 2017 मध्ये पुढाकार घेऊन एक गट स्थापन केला आहे. त्यामध्ये रशिया, अफगाणिस्तान, भारत, इराण, चीन आणि पाकिस्तानमधील विशेष दूतांचा समावेश आहे. या गटाच्या बैठकीच्या काही फेऱ्या 2017 मध्ये मॉस्कोमध्ये झाल्या आहेत.