सेऊल – दक्षिण कोरियामध्ये डॉक्टरांनी संप सुरू केला असून या संपामुळे नियमित वैद्यकीय सेवा विस्कळीत झाल्या आहेत. अनेक अत्यावश्यक शस्त्रक्रीया रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी आपली आरोग्य सेवा त्वरित पुन्हा सुरू करावी, अन्यथा डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे.
दक्षिण कोरियातील सुमारे ७,८०० वैद्यकीय इंटर्न आणि निवासी डॉक्टरांनी अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांना भरती करण्याच्या सरकारच्या दबावाचा निषेध करण्यासाठी या आठवड्यात त्यांची नोकरी सोडली आहे.
दक्षिण कोरियाच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला सावरण्यासाठी पुढील वर्षापासून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशाची मर्यादा २ हजारांनी वाढवायचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मात्र या वाढीव विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता देशातील विद्यापिठांमध्ये नाही, असे सध्या कार्यरत डॉक्टरांनी म्हटले आहे. डॉक्टरांची संख्या वाढल्याने सार्वजनिक वैद्यकीय सुविधांवरील खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते. एकदम २ हजार अतिरिक्त उमेदवारांना प्रवेश हा मूर्खपणाचा आकडा आहे, असे कोरियन इंटर्न रेसिडेंट असोसिएशनने म्हटले आहे