नवी दिल्ली – दक्षिण कोरियाने शुक्रवारी आपला पहिला टेहळणी उपग्रह अवकाशात सोडला. आठवड्याभरापूर्वीच उत्तर कोरियाने आपला पहिला टेहळणी उपग्रह अवकाशात सोडला आहे. त्यानंतर लगेचच दक्षिण कोरियानेही आपला पहिला उपग्रह स्पेस-एक्स फाल्कन रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित केला आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
उपग्रहाच्या छाया चित्रांसाठी दक्षिण कोरियाला आतापर्यंत अमेरिकेच्या उपग्रहांवर अवलंबून रहावे लागत होते. उत्तर कोरियाच्या लष्करी हालचालींची माहिती मिळवण्यासाठी दक्षिण कोरियाला स्वतःचे उपग्रहांचे नेटवर्क उभे करायचे होते. इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड तंत्रज्ञानाच्या आधारे आणखीन चार उपग्रह अवकाशात सोडण्याचे दक्षिण कोरियाचे नियोजन आहे.
शुक्रवारी अवकाशात सोडलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले असून जगभरातील ग्राऊंड स्टेशनशी संपर्क साधला असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. यामुळे संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्यांची पूर्वसूचनाही मिळू शकणार आहे. दक्षिण कोरियाच्या या उपग्रह प्रक्षेपणामुळे अवकाशातील उपग्रहांचे नियंत्रण युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
उत्तर कोरियाने दोन अपयशी प्रक्षेपणांनंतर अलिकडेच उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. या उपग्रहाद्वारे दक्षिण कोरिया आणि थेट अमेरिकेवरही लक्ष ठेवले जाऊ शकेल, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.