Tripura News – त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ माणिक साहा यांनी शुक्रवारी राज्यातील एचआयव्ही/एड्सच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली ते म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील एड्सच्या सक्रिय प्रकरणांची संख्या चिंताजनक आहे.त्रिपुरामध्ये एचआयव्ही/एड्सची एकूण ५,२६९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी ५७५ विद्यार्थी आहेत.
एड्सच्या एकूण रूग्णांपैकी दहा टक्के रूग्ण विद्यार्थी असणे ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. हा आजार रोखण्यासाठी राज्य सरकार एड्स जनजागृती, समुपदेशन आणि चाचणीवर भर देत आहे. त्यासाठी त्रिपुरात 133 एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. एक मोबाइल एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी व्हॅन देखील कार्यरत आहे,असे साहा म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, एचआयव्ही/एड्सचा संसर्ग रोखण्यासाठी आगरतळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जीबीपी रुग्णालयात पालक-ते-बाल संक्रमण प्रतिबंधक केंद्र स्थापन करण्यात आले आहे.एचआयव्ही/एड्सविरुद्धच्या लढाईत तरुणांची मोठी भूमिका आहे ती त्यांनी निभावली पाहिजे.
एड्स रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे, त्यामुळे एड्स प्रतिबंध मोहिमा नियमितपणे आयोजित केल्या पाहिजेत. जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो आणि या वर्षीची थीम ‘समुदायांना नेतृत्व करू द्या’ अशी आहे, जनजागृतीमध्ये समुदायांच्या भूमिकेवर भर दिला जातो.
जागतिक एड्स दिनानिमित्त आगरतळा येथील उमाकांत अकादमी मैदानावर त्रिपुरा राज्य एड्स नियंत्रण संस्थेने आयोजित केलेल्या जनसमुदाय रॅलीत सहभागी होताना मुख्यमंत्री बोलत होते.