पिंपरी – रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (दि. १०) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून लोणावळा व लोणावळ्याकडून पुण्याकडे जाणाऱया लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. आळंदी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा सुरू असल्याने शहर आणि परिसरातून जाणऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मेगाब्लॉकचा भाविकांना फटका बसणार आहे.
आळंदी येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा सुरू असल्याने भाविकांची मांदियाळी आहे. अनेक भाविक राज्याच्या कानाकोपऱयातून पिंपरी चिंचवड येथे निवासासाठी येतात. काहीजण आपल्या नातेवाइकांकडे वास्तव्य करतात. दरम्यानच्या काळात ते आजूबाजूच्या पर्यटनस्थळांना ते भेटी देतात.
मात्र, रविवारी मेगाब्लॉक असल्याने पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱया ५ लोकल गाड्या तर, शिवाजीनगरहून सुटणाऱया दोन लोकलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठीच्या ४ लोकलगाड्या आणि पुण्यासाठी ३ लोकलगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर, गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 03.30 तास रेग्युलेट करण्यात येईल. वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.