क्रिकेट काॅर्नर | …मग डीआरएसचा उपयोग काय

– अमित डोंगरे

क्रिकेटच्या सामन्यात मैदानावर उभा असलेले पंचही चुकू शकतो, त्यासाठी अत्यंत अचूक निर्णय मिळावा यासाठी डीआरएस हा नवा नियम आणला गेला. मात्र, हा नियम जसजसा वापरला जात आहे किंवा मैदानावरील पंचांच्याही कॉलला महत्त्व दिले जात आहे ते पाहता याचा काहीही उपयोग होत नसल्याचेही दिसून येत आहे. 

जर मैदानावरील पंचांच्या निर्णयावर दाद मागण्यासाठीच जर डीआरएसची सुविधा अस्तित्वात आली आहे तर मग त्यात पंचांचा कॉल का पाहिला जातो. जो निर्णय मुळात मैदानावरील पंचाने दिला आहे त्याच्याच विरुद्ध जर हा डीआरएस वापरला जात असेल तर त्यांच्या कॉलला काही अर्थ उरायलाच नको.
पण ही आयसीसीची चूक आहे. कारण गेल्या दोन दशकांपेक्षाही जास्त काळ ज्यांचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही त्या डकवर्थ-लुईस यांनी तयार केलेल्या क्रिकेटचे कोष्टक वापरले जाते व पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात नवे लक्ष्य दिले जाते. त्याच धर्तीवर हा डीआरएस नियम आहे.

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तसेच सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तर हे सातत्याने पाहायला मिळाले. मैदानावरील पंचाला सोल जज म्हटले जात होते. मात्र, आयसीसीने त्यांच्या निर्णयाला जास्तीत जास्त अचूकपणा येण्यासाठी तिसरा पंच ही संकल्पना आणली. तरीही परिस्थिती काही चांगला परिणाम न दिसल्यामुळे त्यांनी हा डीआरएसचा नवा नियम आणला. त्यातही अनेक त्रुटी असल्याचे अनेक सामन्यांतून समोर आले आहे मात्र, तरीही आयसीसी तसेच क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या मेरिलिबोर्न क्रिकेट क्‍लबनेदेखील याचा विचार केलेला नाही. याच कारणासाठी अनेक वर्षे बीसीसीआय या नियमाचा अवलंब करायला तयार झाली नाही. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह भारताच्या अनेक स्टार फलंदाजांनी पहिल्या दिवसापासूनच या नियमाला विरोध दर्शवला होता व त्यामुळेच भारतीय संघ ज्या देशाशी मालिका खेळत होता त्या मालिकांमध्ये डीआरएस हा नियम लावला जात नव्हता. अखेर विराट कोहली कर्णधार बनला व त्याने पुढाकार घेत या नियमाला बीसीसीआयचाही हिरवा कंदील मिळवला. अर्थात त्याच्या कारणही तसेच होते. अनेक सामन्यांत आपला संघ डीआरएस वापरत नव्हता त्यामुळे कित्येकदा समोरचा फलंदाज बाद असतानाही पंचांनी नाबाद ठरवले तरीही त्यावर दाद मागता येत नव्हती व नुकसान भारतीय संघाचेच होत होते.

पंचांच्या निर्णयाला आव्हान देता यावे यासाठी हा डीआरएसचा नियम तयार झाला. मात्र, त्यातील सर्वात मोठा निकष पंचांचा कॉल हाच आता वादात अडकला आहे. त्यातही मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटीत सगळे पंच, सामनाधिकारी भारतीयच आहेत.

करोनाच्या भीतीमुळे परदेशातील पंचांनी या काळात अन्य देशात जाऊन काम करण्यास नकार दिल्याने यजमान देशाचेच पंच काम पाहात आहेत. त्यातही नितीन मेनन, शमसुद्दीन, अनिल चौधरी हे पंच या मालिकेत काम पाहात आहेत. मात्र, पंचांच्या दर्जाबद्दल बोलायचे तर सगळाच आनंद आहे. जर डीआरएस परिपूर्ण व्हावा असे वाटत असेल व तंत्रज्ञानाची जर योग्य मदत होत असेल तर त्यातील पंचांचा कॉल (अम्पायर कॉल) हा पर्याय काढून टाकायला हवा. रिप्ले पाहून तिसरा पंच निर्णय देईल आणि तेव्हाच सत्यता स्पष्ट होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.