विविधा : झाकीर हुसेन

– माधव विद्वांस

जगप्रसिद्ध तबलावादक, संगीतकार, पद्मभूषण झाकीर हुसेन यांचे आज अभिष्टचिंतन. झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च, 1951 रोजी माहीम येथे पंजाबी कुटुंबात झाला. जरी त्यांच्या कुटुंबाचे नाव कुरेशी असले तरी झाकीर यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले. तबला वादनाच्या पंजाब घराण्याच्या परंपरेचे तबला उस्ताद अल्ला रखा त्यांचे वडील. 

स्ताद अल्ला रखा त्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून पखवाज शिकवीत असत. त्यांना त्यांचे वडील पहाटे उठवायचे आणि पहाटे वेगवेगळ्या तालांचे पठण करून गायन शिकवायचे. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. त्यांचे शिक्षण माहीममधील सेंट मायकेल हायस्कूलमध्ये झाले व महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झाले.

वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच आपली कला एका मैफिलीत सादर केली. वयाच्या अकराव्या वर्षांपासूनच ते जाहीर कार्यक्रमामधून भाग घेऊ लागले. वर्ष 1970 मध्ये प्रसिद्ध सतारवादक रवीशंकर यांच्यासमवेत अमेरिका दौऱ्यावर गेले. दौरा पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी पीएच.डी. अभ्यास करण्याचा विचार केला होता. परंतु त्यावेळी उस्ताद अली अकबर खान यांना तबला वादकांची गरज होती, त्यामुळे त्यांच्याबरोबर ते अमेरिकेत कार्यक्रमात सहभागी झाले.

त्यानंतर त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. वर्षाकाठी दीडशेपेक्षा जास्त मैफिली त्यांनी केल्या. लहान वयातच त्यांनी पं. रवीशंकर, उस्ताद विलायतखान, उस्ताद अली अकबर खान, पं. हरि प्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. व्हीजी जोग, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज अशा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रमुख दिग्गजांबरोबर मैफिली केल्या.

त्यांच्या कामगिरीमुळे तबला वादकांची किंमत या क्षेत्रात काम करणाऱ्यांना तसेच प्रेक्षकांनी कळली. त्यापूर्वी तबलावादक म्हणजे एक मैफिलीत साथीदार एवढीच ओळख होती. उस्ताद झाकीर हुसेन यांनी त्यांच्या आवेशपूर्ण तबलावादनाने मंचावर मोठे स्थान निर्माण केले. सतार, सरोद, संतूर इत्यादी संगीत साधनांबरोबर त्यांच्या तबल्याची जुगलबंदी होऊ लागली. अमेरिका आणि युरोपमधील कामगिरीनंतर झाकीर हुसेन यांची किर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली. त्यांनी जगातील अनेक संगीतकारांबरोबर कार्यक्रम केले. त्यांनी व्हायोलिन वादक एल. शंकर, गिटार वादक जॉन मॅक्‍लफ्लिन, मृदंगम वादक रामनाद राघवन आणि विनायकराम यांच्याबरोबर मैफिली केल्या.

वर्ष 1978 मध्ये झाकीर हुसेन यांनी कथक नर्तिका व शिक्षिका अँथोनिया मिन्नेकोला या इटालियन वंशाच्या महिलेशी विवाह केला. त्यांना अनीसा आणि इसाबेला या दोन मुली आहेत. अनीसाने यूसीएलएमधून पदवी संपादन केली आहे आणि व्हिडिओ निर्मिती आणि चित्रपट निर्मितीमध्ये ती काम करीत आहे. इसाबेला मॅनहॅटनमध्ये नृत्य शिकत आहे. झाकीर हुसेन यांचे दोन भाऊ उस्ताद तौफिक कुरेशी, एक तंतुवादक आणि उस्ताद फजल कुरेशी हे देखील तबला वादक आहेत. झाकीर हुसेन यांना शुभेच्छा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.