…तर हा बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान – संजय राऊत 

मुंबई – महाराष्ट्रात जर भाजप-शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळाले तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नव्हता, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते. या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. अमित शहा यांनी बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला आहे. मात्र मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शहा आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली ती बाळासाहेबांची खोली होती. ते आमचे श्रद्धास्थान आहे. येथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, असा शब्दात संजय राऊत यांनी अमित शहांवर टीका केली.

महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच आमची भूमिका होती. पंतप्रधान मोदी व मी तसे जाहीर केले होते. तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही. अमित शहांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना संजय राऊत म्हणाले कि, पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आमची इच्छा नव्हती. तसेच केले असते तर तो या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला असता. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा आम्ही मोदींचा आदर करतो. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही. मात्र शिवसेनेनेही सातत्याने मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचा उल्लेख केला होता. तेव्हाही अमित शहा यांनी हे का नाकारले नाही, असा उलटप्रश्नही त्यांनी केला.

आता बंद खोलीमधील चर्चा बाहेर कशी आली अशी विचारणा भाजपावाले करत आहेत. मात्र तुम्ही ती चर्चा आणि ठरलेली गोष्ट मान्य केली असती तर बंद खोलीत झालेली चर्चा बाहेर आली नसती, असेही संजय राऊत म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.