गृहमंत्री देशमुख यांचे स्पष्टीकरण
पुणे – ‘पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी करोनाच्या काळात मोठी चूक केली. ही चूक समर्थनीय नाही, यासंदर्भात चौकशी होऊन त्यांना शिक्षाही झाली आहे. मात्र, त्यांचे इतक्या वर्षाचे काम आणि पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे,’ असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी स्पष्ट केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये अनौपचारिक गप्पांसाठी देशमुख आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मार्चमध्ये लॉकडाऊन लागू झाला. त्यानंतर येस बॅंक घोटाळ्यातील आरोपी कपिल वाधवान यांच्यासह 22 जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी गुप्ता यांनी परवानगी पत्र दिले होते. यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले होते.
पण, आता गुप्ता यांना पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे. “गुप्ता यांच्याकडून मोठी चूक झाली होती. त्यांनी खुद्द चौकशी समितीकडे याची कबुली दिली. पण त्यांची कारकीर्द चांगली असल्यामुळे त्यांना पुण्याचा पदभार दिला,’ अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.