मुंबई : लोकल सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचा विनापरवानगी लोकल प्रवास

मुंबई : मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज सकाळीच लोकलमधून विनापरवानगी लोकल प्रवास केला. तर ठाणे स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवून कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. ठाण्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय नवी मुंबईत मनसेचे उपशहराध्यक्ष निलेश वानखेडे यांच्या ऐरोली मनसे विभाग कार्यकर्त्यांनी वाशी ते ठाणे असा लोकल प्रवास पूर्ण केला. यादरम्यान रबाळे पोलिसांनी ऐरोली स्थानकात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र सविनय कायदेभंगाच्या इशाऱ्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दादर रेल्वे पोलिस स्टेशन आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ही नोटीस पाठवली आहे. शिवाय, रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या नोटीसमध्ये सांगण्यात आले. परंतु तरीही संदीप देशपांडे यांनी काही कार्यकर्त्यांसह लोकलमधून प्रवास केला.

लोकल सेवा सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. ते म्हणाले की, “नोकरदार कल्याण-डोंबिवलीवरुन तीन-तीन तास प्रवास करुन ड्युटीवर जात आहेत, हे सरकारला दिसत नाही. लवकरात लवकर लोकल सुरु करण्याचा निर्णय घ्या नाहीतर मनसे सविनय कायदेभंग आंदोलन करेल. तिकीट न काढता मी लोकलने प्रवास करेन. कारण जर सरकारला हे कळत नसेल, सर्वसामान्यांचा त्रास दिसत नसेल तर आम्हाला सरकारचे लक्ष वेधावे लागणार आहे.”

आम्ही आंदोलनावर ठाम : संदीप देशपांडे
नोटीस जरी पाठवली तरी आम्ही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. शिवाय आम्ही आमच्या भूमिकेत सरकारमध्ये बसलेल्या राजकीय पक्षासारखा यू-टर्न घेत नसून भमिकेवर ठाम असल्याचे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.