संगमनेर -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संगमनेर मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत थेट लोकप्रतिनिधी तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या निवासस्थासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात महसूलमंत्री थोरात यांच्या भगिनी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व मेहुणे आ. डॉ. सुधीर तांबे यांनीही सहभाग घेत सरकारविरोधी घोषणाबाजी केली.
यावेळी आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाने संगमनेर येथील ना. थोरात यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी केली. आ. थोरातांच्या घरासमोर पुकारलेल्या ठिय्या आंदोलनात विशेष म्हणजे त्यांची बहीण नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व मेहुणे आ. डॉ. तांबे हे ही सहभागी झाले होते. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या 26 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण ठराव केले होते. तसेच गांधी जयंतीचे औचित्य साधत महाविकास आघाडातील मंत्री आणि नेते यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची हाक मराठा क्रांती मोर्चाने दिली होती. त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आज खासदार, आमदारांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. सुमारे एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी देवू केलेला चहा, नाश्ता आंदोलकांनी नाकारला. निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शरद थोरात, अमोल खताळ, खंडू सातपुते, अमोल कवडे, किरण घोटेकर, अशोक सातपुते, राजेंद्र देशमुख, नारायण खुळे, अविनाश थोरात, अजित काकडे, राजू सातपुते, रमेश काळे, दिनेश फटांगरे, सुधाकर गुंजाळ, इंद्रजित थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, नवनाथ अरगडे, मंजाबापू साळवे, सदाशिव हासे, दुर्गाताई तांबे, निर्मलाताई गुंजाळ, शॉन थोरात, अभिषेक थोरात, सुमित पवार, सुशांत पावसे, सिद्धेश घाडगे, संजय मोरे, अविनाश साबळे, अण्णा शेलकर, सौरभ देशमुख आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.