राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते पेचात
बारामती – अजित पवार यांनी आज राजकीय खेळीद्वारे टाकलेल्या “बॉम्ब’मुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून काय नेमकं चालू आहे, शरद पवार काय भूमिका घेणार अन् पुढे काय होणार यासारख्या अनेक प्रश्नांनी बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांपुढे उभे असून पवारांना की अजित पवारांना पाठिंबा द्यायचा असा पेच निर्माण झाल्याने बारामती शहरातच नव्हे तर तालुक्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
दोन परस्परविरोधी विचारधारा असलेले पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि अजित पवार हे भाजपसोबत जातील, यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. या परिस्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची हेच कार्यकर्त्यांना समजत नव्हते. राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर कोणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसले तरी अनेकांनी शरद पवार यांच्या पाठिशी उभे राहण्याचा पण केला आहे. तर अजित पवार यांच्या विरोधात दगडही उभा केला तर त्याला निवडून आणू, अशा प्रतिक्रियाही बारामतीकरांनी दिल्या आहेत. त्यामुळे बारामतीतील काही कार्यकर्ते तळ्यातमळ्यात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, सध्या घडत असलेले नाट्य नेमके काय आहे हेच भल्याभल्यांना समजत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहे. आज, सकाळपासून बारामतीत केवळ या एकाच विषयाची सगळीकडे चर्चा होती. लोकांचे दैनंदिन कामकाज सुरू झालेले असले तरी सगळेच “इडियट’ बॉक्स अर्थात दुरचित्रवाहिन्यांसमोर बसून क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. तर अनेकांनी स्वतःची मते सांगितली. मात्र, थेटपणे बोलण्यास अथवा नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर तोडक्यामोडक्या प्रतिक्रिया देत होत्या. तर मिनिटामिनटाला मुंबईत नाट्यमय घडामोडी होत असताना हे नाट्य नेमके कोणत्या दिशेने चालले आहे आणि पुढे काय होणार याचीच उत्सुकता बारामतीकरांना लागून आहे.
सहयोगच्या बाहेर पोलिसांचा कडकबंदोबस्त…
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानासमोर बंदोबस्त पोलिसांनी वाढविला आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जात आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर वेगाने घडामोडी सुरू असून या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. कोणताही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांना पडले अनेक प्रश्न…
थोड थांबा यात नेमके काय आहे ते समोर येईल, अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. मात्र, तरीही अजित पवार यांनी बंड केले आहे, राष्ट्रवादीतून बाहेरपडून त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे का? शरद पवार, सुप्रिया सुळे यांना या बाबतची माहिती होती की नव्हती, जर अजित पवार यांनी बंडाची भूमिका घेतली असेल तर कार्यकर्त्यांनी नेमक काय करायचे, असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांना पडले असून याचे उत्तर शोधण्यासाठी ते वरिष्ठांसमेवत व आपापसात चर्चा करीत आहेत.