मुंबई : राज्यातील नाट्यमय घडामोडी काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण काल दिवसभर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या आमदारांवरून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळाले होते. दरम्यान, आता यासर्व घडामोडीत राष्ट्रवादीचे आमदार गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा हे गायब झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकांत ते गायब झाल्याची तक्रार दाखल केली आहे. शनिवारी पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीत, शुक्रवार रात्रीपासून आमदार गायब असल्याचं सांगण्यात आलं आहे. आमदारांचा लवकरात लवकर शोध घेण्याची विनंती या कुटुंबाकडून घेण्यात आली आहे. दौलत दरोडा यांच्या कुटुंबातील सदस्य पांडुरंग बरोरा यांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
याशिवाय नाशिकच्या कळवण भागातील राष्ट्रवादीचे आमदार नितिन पवारदेखील गायब झाल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर शनिवारी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्मथनातून शिवमहाआघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असतानाच, शनिवारी संपूर्ण राजकीय खेळी पलटली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुर्णपणे ढवळून निघाले आहे.