सिंहगडरस्ता – सिंहगड रोडवरील स्वच्छतागृह स्वच्छ दाखवा व एक हजार रुपये बक्षिस मिळवा, असे थेट आव्हान आम आदमी पक्षाचे धनंजय बेनकर यांनी क्षेत्रीय कार्यालयासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
सिंहगड रस्ता परिसरात लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची कमतरता असून जे आहेत त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बऱ्याच स्वच्छतागृहांमध्ये वीजेचे कनेक्शन नाही रात्रीच्यावेळी वीज नसते. या स्वच्छतागृहेत घाणीचे साम्राज्य पसरले असून महिला आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात बेनकर यांनी सांगितले की, स्वच्छतागृह कोणत्या ठेकेदारांमार्फत स्वच्छ केली जातात, त्याची निविदा काढली जाते का? अशा प्रश्नांवर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्व स्वच्छतागृह दररोज स्वच्छ केली जातात, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांने लेखी उत्तर दिले आहे. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळे आहे. ही स्वच्छतागृहे एवढी घाण आहेत की त्याचे छायाचित्रे काढून ती संबंधीत अधिकाऱ्यांना फ्रेम करून देणार आहोत.
सिंहगड रस्ता भागातील स्वच्छतागृहाच्या संदर्भात शिवसेनेचे ठाकरे गट महेश पोकळे यांनीही वारंवार आवाज उठवला आहे. पोकळे यांनी सांगितले की, स्वच्छता देखभाल दुरुस्ती यासाठी लाखो रुपयाचा निधी दरवर्षी महापालिकेकडून खर्च केला जातो. परंतु, स्वच्छता काही होत नाही मग हा निधी जातो कुठे?