सहकारनगर (हर्षद कटारिया ) – शिवदर्शन येथे वसाहतीमध्ये राहणारा किरण राजेश व्यवहारे हा केश कर्तनालयाचा (कटिंग) व्यवसाय करताना जिद्द व प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर गरिबीवर मात करीत “खाकी वाला’ झाला आहे. नुकत्याच आलेल्या पोलीस परीक्षेत किरण याला 150 पैकी 123 गुण पडले आहेत. तो उत्तीर्ण झाला असून मुंबई येथे वसई विरार आयुक्तालयात तो पोलीस शिपाई म्हणून रूजू होणार आहे.
मूळ बीड या गावचा किरण शिवदर्शन येथे बायकोसह संसार करतो. रोजगार म्हणून केश कर्तनालयाचे दुकान चालवितो. त्याच्याकडे केस कापण्यासाठी येणारे एमपीएससी, यूपीएससीचे विद्यार्थी त्याच्यासाठी आदर्श ठरले. दुकाना शेजारी स्व-रूपवर्धिनी मार्फत अजय रायकर हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे येथे समन्वय म्हणून काम करतात मनपाच्या या अभ्यासिकेत जिद्दीने अभ्यास करून किरण पोलीस बनला आहे.
किरण याला पोलीस करण्याचे स्वप्न त्याच्या वडीलांचे होते. मात्र, वडीलांचे 2018 मध्ये आजारीपणात निधन झाले. किरण याने कर्तनालयालाही वडीलांचे नाव दिले आणि जिद्दीने वडीलांचे स्वप्न पूर्ण केले. प्रामाणिकपणा, सचोटी, जिद्द, पूर्ण झोकून देऊन गुण मिळवण्याची तयारी मनातील तळमळ यावर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने त्याचा हा संघर्ष सुरू होता. सकाळी अभ्यासिका उघडण्याच्या आधीपासून करण हा अभ्यासिकेच्या बाहेर अभ्यास करीत बसलेला असायचा. त्याने कधीही मैदानावरील सराव चुकवला नाही.
शिवदर्शन वसाहतीमध्ये गरीब परिस्थिती असलेल्या मुलांना येथील अभ्यासिका उज्वल भविष्याची गुरुकिल्ली ठरत आहे. किरण अभ्यासिकेतील 60 मुलांची महिनाभरात कटिंग करायचा. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याची मोठी धडपड होती, मला पोलीस व्हायचाच आहे, या मेहनतीने तो प्रत्येक पाऊल पाऊल टाकत गेला आणि पोलीस झाला. अभ्यासिका मधील अनेक मुले उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षित होत असल्याचा आनंद आहे.
– रघुनाथ गौडा, माजी नगरसेवक