नवी दिल्ली – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे 2018 साली माझ्याकडून पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी काढून घेतली गेली व महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.
हा अपमान होता मात्र, तरीही महिला संघातील खेळाडूंनी मला आदर दिला, सल्ला मानला व आज महिला संघाला हे यश मिळाले, त्यामुळे मी समाधानी आहे. मात्र, त्यावेळी झालेल्या अपमानाची सल आजही आहे, अशा शब्दात भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नेदरलॅंड्सचे माजी हॉकीपटू असलेल्या मरिन यांच्याकडे 2017 साली महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांतच त्यांची पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. परंतु 2018 साली हरेंद्र सिंग यांना पुरुष संघाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे मरिन यांना परत महिलांचे प्रशिक्षक करण्यात आले.
तेव्हा जे घडले, त्याच्या वेदना आजही विसरलेलो नाही. मात्र, जेव्हा मला महिला संघाची जबाबदारी पुन्हा दिली, तेव्हा गोलरक्षक सविता म्हणाली, तुम्ही परत आलात, त्याबद्दल आम्ही खरच खूप आनंदित आहोत. तिच्या त्या पाठिंब्यामुळे माझ्या मनातील नैराश्य दूर झाले व पूर्ण सकारात्मकतेने मी कार्यरत झालो, असे मरिन यांनी सांगितले.