नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत चालला असून स्पेनमध्ये 24 तासांत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्पेनमध्ये करोनाचे दोन हजार नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपमध्ये कोरोनामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये इटलीनतंर स्पेनचा क्रमांक असून मोठा फटका बसला आहे. स्पेनमधून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या 7753 वर पोहोचली असून यामधील 288 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याने स्पेनने काळजी घेण्यास सुरुवात केली असून इटलीपाठोपाठ प्रवासबंदीसह अन्य कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. तसेच दोन आठवड्यांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कामावर जाणे, वैद्यकीय चाचणी आणि अन्न खरेदी याशिवाय कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
स्पेनमध्ये शनिवारी सगळा देश बंद ठेवण्याची वेळ आली. प्रादेशिक ठिकाणी या दोन्ही देशांना करोनाचा प्रसार रोखण्यात अपयश येत असताना हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाशी लढा देण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात असून बस आणि ट्रेन्सची संख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त करण्यात आली आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांच्या पत्नीनंतर आता स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सॅंचेझ यांच्या पत्नीची करोना चाचणी सकारात्मक आली आहे. आणीबाणी जाहीर केल्यानंतर काही वेळातच यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने यासंबंधी निवेदन जारी करत पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती सध्या ठीक असून दोघेही सरकारी निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखेखाली असल्याचे सांगण्यात आले.