दुय्यम सॅनिटायझर विक्रीप्रकरणी आणखी दोघे अटक

साडेतीन लाखांचा मुद्देमाल आतापर्यंत हस्तगत

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुय्यम दर्जाच्या सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेने दत्तवाडी परिसरात कारवाई केली होती. यामध्ये शनिवारी तिघांना अटक करण्यात आली, तर तपासात आणखी दोघांना रविवारी अटक करण्यात आली. आतापर्यंत एकूण 3 लाख 35 हजारांचे सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे. तसेच साकीनाका येथील उत्पादन युनिटही सील करण्यात आले आहे.

दत्तवाडी परिसरात दुय्यम दर्जाची सॅनिटायझर विक्री केली जात असल्याची खबर अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट-1च्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी दत्तवाडी परिसारत पाहणी करून सॅनिटायझर विक्रेत्यांवर छापे टाकले. त्यानंतर “एफडीए’च्या पथकाने या सॅनिटायझरची पडताळणी केली. त्यामध्ये संबंधित सॅनिटायझर दुय्यम दर्जाची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिघांविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

यातील मुख्य आरोपीचा सॅनिटायझर सप्लाय करायचा व्यवसाय आहे. सध्या सॅनिटायझरचा तुटवडा सुरू झाला. त्याने बनावट सॅनिटायझरची विक्री करून फायदा उवठण्याची कल्पना मित्रांना बोलून दाखवली. यानंतर त्यांनी साकीनाका येथील एका उत्पादकाशी संपर्क साधला. या उत्पादकाकडे कोणताही अधिकृत परवाना नसताना, तो सॅनिटायझरचे उत्पादन घेत होता.

गैरप्रकार करणाऱ्यांबाबत माहिती कळवा
सॅनिटायजर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरिकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर कळवावी किंवा 897-528-3100 व्हॉट्‌सऍप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.