Indiana : अमेरिकेतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे सत्र काही केल्या थांबत नाहीत. कारण अमेरिकेतील इंडियाना राज्यातील फिटनेस सेंटरमध्ये मागच्या महिन्यात एका भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याच्यावर तेंव्हापासून उपचार सुरु होते मात्र बुधवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
वरुण राज पुचा या भारतीय तरुणावर हल्ला करण्यात आला होता. त्याचा बुधवारी मृत्यू झाला. जॉर्डन अँड्राडे (२४)असं आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी पकडले आहे. मुळचा तेलंगणातील असलेला पी वरूण राज पुचा हा कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी होता. जॉर्डन अँड्राडेने पोलिसांना सांगितले की वरुण आणि तो एकमेकांशी हल्ल्यापूर्वी कधीही बोलले नव्हते. परंतु, वरूण धमकी देत असल्याचं कोणीतरी जॉर्डनला सांगितले. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करताना पोलिसांनी जीममधील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या चौकशीतून असं समोर आलं की वरुण शांत स्वभावाचा विद्यार्थी होता. तसंच, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वालपरिसो विद्यापीठाने शोक व्यक्त केला आहे.
“वरुण राज पुचा याच्या निधनाबद्दल आम्ही जड अंतःकरणाने दुःख व्यक्त करतो. आमच्या कॅम्पस समुदायाने एक विद्यार्थी गमावला आहे. त्याच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी आमच्या सहवेदना आहेत, असं निवेदन विद्यापीठाने जारी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण २९ ऑक्टोबर सकाळच्या सुमारास शहरातील एका सार्वजनिक जिमममध्ये गेला असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात आपल्या कबुली जबाबात आरोपी जॉर्डन अँड्रॅडनं माहिती दिली आहे. जॉर्डन सकाळी जिमच्या मसाज रुममध्ये गेला असता तिथे वरुण आधीच हजर होता. “मी मसाज रूममध्ये गेलो तेव्हा मला वरुण थोडा विचित्र वाटला. त्याच्याकडून माझ्या जिवाला धोका असून तो माझ्यावर जीवघेणा हल्ला करू शकतो, असं मला वाटलं. त्यामुळे फक्त आपला जीव वाचवण्यासाठी मी त्याच्यावर हल्ला केला”, असे जॉर्डनने म्हटले.