नवी दिल्ली : हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मर्सिडीज कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
हैदराबादमधील उच्चभ्रू वस्ती जुबली हिल्समध्ये एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तीन ते चार आरोपींचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. तसेच इतर आरोपींमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. पीडित मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
#Hyderabad rape | Victim couldn’t reveal anything about culprits. She only revealed one name & spl teams were immediately formed to nab them. CCTV footage recovered. We’ve identified 5 culprits as per CCTV footage and as per the statement of the victim: Joel Davis, West Zone DCP pic.twitter.com/Cbp9xwWKmR
— ANI (@ANI) June 3, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या मैत्रिणीच्या एका पार्टीत सहभागी होण्यासाठी गेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेसोबत पार्टीमध्ये एका आमदाराचा मुलगा आणि अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. सध्या पीडितेने फक्त एका आरोपीची ओळख पटवून त्याचे नाव सांगितले आहे. हा आरोपीही अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सर्व घटनेत अल्पवयीन सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींमध्ये तीन राजकारण्यांच्या मुलांचा समावेश आहे. त्यापैकी एक एआयएमआयएम नेत्याचा मुलगा आहे, दुसरा टीआरएस नेत्याचा मुलगा आहे आणि तिसरा काँग्रेस नेत्याचा मुलगा आहे. आरोपींमध्ये एक आरोपी आमदाराचा मुलाचा तर दुसरा आरोपी राज्य सरकारी मंडळाच्या अध्यक्षाचा मुलगा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर तिसरा आरोपी हा विरोधी पक्षांमध्ये सहभागी असलेल्या एका नेत्याचा मुलगा आहे. दुसरीकडे, आरोपींबाबत पोलिसांनी सांगितलं की, आरोपी अल्पवयीन आहेत, त्यामुळे त्यांची नावं उघड करू शकत नाहीत. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावामुळे पोलीस ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.