मुंबई : ठाण्यातील मुंब्रामधील कौसा परिसरात एक दूध विक्रेता एका इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जटाशंकर पाल असे मृत दूध विक्रेत्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे दूध वितरित करण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. मात्र इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये त्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कौसा परिसरातील अलमास कॉलनी इथल्या अनमोल एमराल्ड इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये दूध विक्रेत्याचा मृतदेह आढळून आला. संबंधित दूध विक्रेता घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांना फोन केला. त्यावेळी समोरुन एका व्यक्तीने त्यांचा फोन उचलून फोन, चावी, गाडी आणि दूध बाहेरच असल्याचे विक्रेता मात्र कुठेही दिसत नसल्याचे सांगितले.
यानंतर कुटुंबियांनी तातडीने इमारतीकडे धाव घेतली. त्यावेळी विचारपूस केल्यानंतर, शोधाशोध केल्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्याचा मृतदेह लिफ्ट डक्टमध्ये आढळला. कुटुंबियांनी याची माहिती मुंब्रा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तर मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक एन कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दूध विक्रेत्याने तळमजल्यावरुन लिफ्टचे बटण दाबले होते. लिफ्टची ट्रॉली तिथेच असल्याचं समजून त्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॉली वरच्या मजल्यावर होती, पण काही समजायच्या आत तो दुधाच्या किटल्यांसह खाली पडला असावा. त्याने मदतीसाठी हाक मारण्याचाही प्रयत्न केला असेल, पण तिथे कोणाचं लक्ष गेलं नसावं.”याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासानंतर जटाशंकर पालचा मृत्यू कसा झाला हे समोर येईल.