मुंबई : चेंबूर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईसह तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आपल्या पत्नीसह तान्ह्या बाळाला करोनाग्रस्तांसाठी नव्याने रिकाम्या करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्यानेच त्यांना करोनाची लागण झाल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. याव्यतिरिक्त सदर नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्टलादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे. सध्या या तिघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
२९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या पत्नीची प्रसुती झाली. त्यानंतर माझ्या पत्नीला आणि तान्ह्या बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आले . परंतु दुपारी २ च्या सुमारास एका परिचारिकेने आम्हाला पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितले , अशी माहिती महिलेच्या पतीनं दिली. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
२४ तासांनंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला.आम्हाला ज्या खोलीत हलवण्यात आले होते ती खोली करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर तपासण्यासाठी येणार नाही असे त्यांनी आम्हाला सांगितले, असा आरोपही महिलेच्या पतीने केला आहे. जर आम्हाला या गोष्टीची कल्पना असती तर आम्ही आमचे कपडे बदलले असते किंवा स्वत:ला सॅनिटाईझ केले असते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आपल्या पत्नीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती, असेही त्यांच्या पतीने नमूद केले.