खडकी पुलावरील कठड्यांच्या पाईपची चोरी

कोपरगाव  -तालुक्‍यातील घारी व चांदेकसारे गावे जोडण्यासाठी खडकी नदीवर तयार केलेल्या पुलावरील सुरक्षा कठड्यांवरील लोखंडी पाईप चोरीस गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोपरगाव तालुक्‍यातील चांदेकसारे व घारी या दोन गावांच्यामध्ये खडकी नदी आहे. या नदीवर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने 25 वर्षांपूर्वी पूल उभारला आहे. या पुलामुळे डाऊच बुद्रुक, हिंगणी, घारी आदी गावांतील जनतेची दळणवळणाची चांगली सोय झाली. जवळपास 200 फूट लांब असणाऱ्या या पुलाच्या दोन्ही बाजूला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उभारलेल्या कठड्यांवर लोखंडी पाईप बसवले आहेत.

मात्र यातील एका बाजूचे निम्म्यापेक्षा जास्त लोखंडी पाईप चोरीला गेले आहेत. तसेच एका बाजूचे सिमेंटचे कठडे वाहनांच्या धडकेत पडलेले आहेत. त्यामुळे एवढा चांगला बांधलेला व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे. चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धडकेने हे कठडे पडल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे. तसेच उरलेल्या पाईपकडेही लक्ष न दिल्यास ते चोरीस जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.