नगर -कल्याण रोड परिसराची लोकवस्ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येथील नागरी सुविधांचे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. तथापि, या परिसराला मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शिवसेना सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करेल, अशी भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी व्यक्त केली.
कल्याण रोड परिसरातील समतानगर भागात बंद पाईप गटरच्या कामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, नगरसेवक सचिन शिंदे, दीपक खेरे, दत्ता जाधव, सेवानिवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे, पारुनाथ ढोकळे, भगवान काटे, बाबा नागवडे, मदन काशिद, शरद सोनवणे, विलास धाडगे, कांतीलाल ढवळे, उत्तमराव राजळे, यांच्यासह परिसरातील नागरीकही यावेळी उपस्थित होते. नगरसेविका जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कल्याणरोड परिसराच्या विकासाचे नियोजन करुन विकास आराखडा तयार केला आहे.
टप्प्याटप्प्याने या भागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावणार आहोत, असे त्या म्हणाल्या. खासेराव शितोळे यांनीही यावेळी सूचना केल्या. 30 वर्षांपासून कल्याणरोड परिसरात नागरी वसाहत वाढत आहे. अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करावा, असे ते म्हणाले.