नगर -शिवसेनेच्यावतीने माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डीझेलच्या भाववाढीचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस काळे फासून त्यांचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, गिरीश जाधव, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, श्याम नळकांडे, दत्ता जाधव, रमेश परतानी, राजेंद्र भगत, महिला जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, दीपक खैरे, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, मुन्ना भिंगारदिवे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. सातपुते म्हणाले, केंद्र सरकार फक्त मोठमोठ्या घोषणा करत आहे. त्याचा प्रत्यक्षात नागरिकांना कोणताही लाभ होत नाही. केंद्र सरकार हे मूठभर उद्योगपतींच्या फायद्याचेच निर्णय घेत आहे.
त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. त्यामुळे महागाईमध्ये वाढ होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून करोनाने जनेता आर्थिक संकटात सापडली असून, त्यांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल-डीझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असे सांगितले. विक्रम राठोड म्हणाले, शेतकरी आपल्या हक्कांसाठी सनदशिर मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना चिनी-पाकिस्तानी पुरस्कृत आंदोलन म्हणणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे खरे देशाचे शत्रू आहेत.
अन्नदात्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेचाही अनादर केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयांचा सर्वसामान्यांला मोठा फटका बसत असून, सर्वत्र दरवाढीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. याचा निषेध करुन दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. यावेळी शिवसैनिकांनी पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी आणून निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकार व ना. रावसाहेब दानवे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.