एम. डी. पाखरे
आळंदी, दि. 12 – माऊली…तुकाराम असा नामजयघोष करीत शनिवारी (दि. 12) मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माऊलींचा वैभवी चांदीचा मुखवटा रथोत्सवात पूजा बांधीत रथोत्सव हरिनाम गजरात प्रथापरंपरेचे पालन करीत साजरा झाला. परिसरातून भाविक, वारकरी, दिंडीकरी “श्रीं’च्या रथोत्सवात सहभागी होण्यास जमले होते. “श्रीं’ची पूजा होताच माऊलींचा चांदीचा मुखवटा ग्रामप्रदक्षिणेसाठी पालखीतून मंदिराबाहेर आणण्यात आला.
यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टरवर पुष्प सजावट केलेल्या रथात माऊलींचा मुखवटा ठेवण्यात आला. “श्रीं’च्या रथासमोर श्रीकृष्ण मंदिरासमोर भाविक वारकऱ्यांचे दिंडीतून भगव्या पताका उंचावत माऊली…माऊलींचा गजर करीत रथोत्सव सुरू झाला. ग्रामप्रदक्षिणा चाकण, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिणी चौकमार्गे हरिनाम गजरात पार पडला. रविवारी (दि.13) आळंदीत “श्रीं’चा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होत आहे.
ज्ञानभक्ती चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकींने नगरप्रदक्षिणा कार्तिकी वारीत झाली. गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने “श्रीं’ची विधिवत पूजा झाली. रथोत्सवास पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, माऊली जळगावकर, व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा “श्रीं’चे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, क्षेत्रोपाध्ये इनामदार परिवार, रामभाऊ चोपदार, वेदांत चोपदार, मानकरी साहिल बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश आरु, “श्रीं’चे मानकरी, भाविक, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, रथोत्सवाची सांगता मंदिरात झाली.
मंदिरात प्रदक्षिणा, धुपारती झाली. दरम्यान वीणा मंडपात हरिभाऊ बडवे, केंदूरकर महाराज यांचे वतीने परंपरेने कीर्तन सेवा झाली. कीर्तनसेवेनंतर “श्रीं’च्या गाभाऱ्यात निमंत्रितांना खिरापत प्रसाद वाटप तर वीणा मंडपात फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसादाचे वाटप परंपरेने झाले.
श्री पांडुरंगाच्या पादुकांना “इंद्रायणी’ स्नान
संजीवन समाधी सोहळ्यातील “कार्तिकी द्वादशी दिनी’ श्री पांडुरंगाच्या पादुकांना इंद्रायणी नदीवर हरिनाम गजरात घेऊन जात दिंडीचे नाम जयघोषात “श्रीं’च्या पादुकांना हरिनाम गजरात पादुका स्नान झाले. यावेळी मोजकेच वारकरी भाविक उपस्थित होते. यावर्षी करोनाच्या सावटाने राज्य परिसरातून अलंकापुरीत भाविकांना नदीवर स्नानास बंदी असल्याने भाविकांविना इंद्रायणी घाट सुनासुना राहिला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान कर्मचारी गोपाल देशमुख, ऋषिकेश वासकर महाराज, देवस्थान सदस्य माऊली जळगावकर, विणेकरी माऊली भोसले, आळंदीचे माजी अध्यक्ष सुरेश वडगावकर, आळंदी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर तसेच पुजारी, चोपदार, वारकरी उपस्थित होते.
आजचे धार्मिक कार्यक्रम
माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 13) संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा होणार आहे. तत्पूर्वी माऊली मंदिरात प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांचे हस्ते “श्रीं’ना पवमान अभिषेक आणि दुधारती होईल. भाविकांचे महापूजा यावर्षी होणार नाहीत. संत नामदेवराय यांच्या वतीने “श्री’ंना नामदास महाराज परिवाराचे वतीने महापूजा होईल. परंपरेने वीणा मंडप, भोजलिंगकाका मंडप, हैबतरावबाबा पायरीपुढे परंपरेने कीर्तन सेवा रुजू होईल. सकाळी दहा वाजता नामदास महाराज यांचे परंपरेने “श्रीं’च्या संजीवन समाधी सोहळ्यातील कीर्तन होणार आहे.
दरम्यान, महाद्वारात काल्याचे कीर्तन त्यानंतर श्रीगुरू हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर प्रदक्षिणा होईल. दुपारी बाराच्या सुमारास “श्रीं’च्या संजीवन समाधीवर पुष्पवर्षाव, आरती आणि घंटानाद होणार आहे. सोपानकाका देहूकर यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन त्यानंतर हैबतरावबाबा यांच्या वतीने हरिजागर होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.