पुणे – केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने अभिनव आंदोलने करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक पध्दतीने फासावर लटविण्यात आले तर शिवसेने गॅस सिलेंडरची अंतयात्रा काढत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे या अभिनव आंदोलनांची शहरात दिवसभर चर्चा होती.
राष्ट्रवादीने दिली प्रतिकात्मक फाशी
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात गॅस सिलेंडरला प्रतीकात्मक पद्धतीने फासावर लटकवले. सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या केंद्र शासन असल्याची टिका करत केंद्राच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 2014 साली महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांचे भांडवल करत भारतीय जनता पार्टी सत्तेत आली.
सत्तेत आल्यानंतर मात्र ज्या सर्वसामान्य भारतीयांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेत बसवले, त्या सर्वसामान्य जनतेचा मात्र भाजपला विसर पडला.त्यावेळेस 300 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज तब्बल 1000 रुपयांवर गेला आहे. पेट्रोल,डिझेल यांच्या दराने शंभरी पार केली असल्याने सर्वसामान्य भाजपला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही अशी टिका या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. प्रवक्ते प्रदीप देशमुख,संदीप बालवडकर,महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी,संतोष फरांदे,उदय महाले,काका चव्हाण,संतोष नांगरे,गणेश नलावडे,महेश हांडे, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेने काढली प्रतिकात्मक अंतयात्रा
शहर शिवसेनेच्या वतीने नवीपेठ येथील पेट्रोल पंप ते वैकुंठ स्मशानभूमी पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरचे प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली . यावेळी केंद्राच्या धोरणावर जोरदार टिका करण्यात आली. केंद्रातील भाजपाचे सरकार याने 2019 च्या निवडणुकीच्या उद्देशाने उज्वला घरगुती गॅस योजना राबवली. या योजनेअंतर्गत मोफत गॅस म्हणून रू. 350 घेउनच कनेक्शन देण्यात आले. याचा डंका पिटण्यात आला. मात्र सत्तेवर येताच घरगुती गॅस सिलिंडरची सबसिडी काढून टाकली.
सिलेंडरची किंमत हजार रूपयांवर गेला असल्याने सर्वसामान्य होरपळत आहे. त्यामुळे भाजपचा कारभार म्हणजे केवळ फसवणूक आहे अशी टिका यावेळी करण्यात आली. शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, शहर संघटिका पल्लवी जावळे,संगीता ठोसर, शर्मिला येवले,नगरसेवक बाळा ओसवाल, प्रशांत राणे, तानाजी लोणकर, भरत कुंभारकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.