South Mumbai Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भायखळा विधानसभा मतदार संघाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अरविंद सावंत उमेदवार आहेत. त्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. (Lok Sabha Election 2024 Candidate of MLA Yamini Jadhav from Shiv Sena Shinde group has been announced in South Mumbai Lok Sabha Constituency)
हा मतदारसंघ हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघ म्हणून देखील ओळखला जातो. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघ, याबरोबरच शिवडी, यामिनी जाधव यांचा भायखळा, मंगल प्रभात लोढा यांचा मलबार हिल, अमीन पटेल यांचा मुंबादेवी आणि राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो.
2004 आणि 2009 या सलग दोन लोकसभा निवडणुकीमध्ये मिलिंद देवरा हे या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तर 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत या लोकसभा मतदारसंघात विजय ठरले. मात्र आता मिलिंद देवरा यांनी गेल्या 55 वर्षांपासून काँग्रेसचे असलेले आपले संबंध तोडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.