नगरसह शिर्डीतही विखेंच्या सरशीने आ. थोरातांसाठी धोक्‍याची घंटा

नितिन शेळके
संगमनेर – शिर्डीतून शिवसेनेने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळवला. आ. कांबळे आणि खा. लोखंडे यांच्यात ही लढत झाली असली तरी खरी लढत एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यात झाली. या निवडणुकीत विखेंचीच सरशी झाली असल्याने आ. थोरात यांच्यासाठी हा विजय धोक्‍याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघातून वीस उमेदवारांनी खासदारकीचे स्वप्न बघितली. शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद आणि मतदारांचा कौल लोखंडे यांना राहिला. वास्तविक गेल्या पाच वर्षाच्या काळात लोखंडे मतदारसंघात फारसे फिरकले देखील नाही. त्यामुळे त्यांच्यावर मतदारांची मोठी नाराजी होती. या नाराजीचा फटका त्यांना मतदानातून बसेल आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल असा राजकीय अंदाज होता. याच पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली.

नगर, शिर्डी मतदार संघातील विखे यांच्या बदलेल्या भूमिकेमुळे या दोन्ही मतदार संघातील चित्र बदलेले गेले. डॉ. सुजय विखे भाजपचे उमेदवार ठरल्याने लोखंडेंना मोठी मदत मिळाली. पर्यायाने कांबळेच्या प्रचाराची सारी भिस्त आ. थोरात यांच्यावर येऊन पडली. यातून विखे-थोरात यांच्यातील संघर्ष देखील वाढीला लागला. नगरचे मतदान संपताच राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांनी आपली सारी यंत्रणा लोखंडेच्या पाठीमागे उभी केली. त्यामुळे पराभवाच्या छायेत आलेल्या लोखंडे यांच्यासाठी विखे फॅक्‍टर संजीवनी ठरला. कांबळे यांच्यासाठी आ.थोरात यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असली तरी विखेंच्या प्रत्यक्ष मदतीमुळे लोखंडे यांनी थोरातांना धक्का दिला.

थोरात यांच्या संगमनेर मतदार संघातून लोखंडेंना 7 हजार 625 मतांची निर्णायक आघाडी घेत थोरातांना कोंडीत पकडले, तर शेजारच्याच अकोले तालुक्‍यात माजीमंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मतदार संघात भाऊसाहेब कांबळे यांना आघाडी मिळाली हा एकमेव अपवाद वगळला. अन्य कोणत्याही मतदारसंघात कांबळे तग धरू शकले नाही, स्वतःआमदार असलेल्या श्रीरामपूर होमपिचवर देखील प्रतिस्पर्धी लोखंडेंना आघाडी मिळाल्याने त्यांची देखील तेथे नाचक्की झाली.

गेल्यावेळी सतरा दिवसात खासदार झालेल्या लोखंडें साठी यावेळी खासदारकी स्वप्न ठरण्याची चिन्हे होती, मात्र शेवटच्या पाच दिवसात त्याच्या मदतीला आलेल्या विखे यांनी आपली ताकद दाखून देताना स्वतःच्या मतदार संघात तब्बल 62 हजार 871 एवढे विक्रमी मताधिक्‍य देऊन त्यांना विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवले. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीत थोरात-विखे संघर्ष तीव्रतेने बघायला मिळेल. आजवर पक्षांतर्गत हा वाद होता. परंतू आता पक्षच बदलले गेल्याने हा संघर्ष तीव्र होण्याची शक्‍यता आहे. आज राज्यपातळीवरील कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये महत्वाचे स्थान आ. थोरात यांच्याकडे आहे. लोकसभेचा निकाल लागल्याने विखे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. यात आता शंका राहिलेली नाही. परंतू लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे राज्यपातळीवरील बहुतांशी नेत्यांना भाजपने धुळ चारली आहे. आता त्याचे लक्ष आ. थोरात असू शकतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)