आ. मोनिका राजळे यांच्या परिश्रमाला फळ

बाबासाहेब गर्जे
ओबीसी एकवटल्याने ना. मुंडेंचा बालेकिल्ला अधिक भक्कम!

पाथर्डी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हिंदुत्ववादी मतदारांचा विश्‍वास, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा करिष्मा, आमदार मोनिका राजळे यांचे अथक परिश्रम, डॉ. विखेंनी जुळवलेली विश्‍वासू कार्यकर्त्यांची फौज, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून डॉ. विखेंविषयीची आपुलकी, स्व. बाळासाहेब विखेंच्या नावाचे वलय, राष्ट्रवादीच्या प्रचारामुळे भाजपकडून एकवटलेला ओबीसी समाज अशा अनेक गोष्टीमुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणाला मतपेटीपर्यंत पोहचविण्यात विखे यंत्रणा यशस्वी झाल्याने शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून डॉ. सुजय विखेंना सुमारे साठ हजाराचे मताधिक्‍य मिळाले आहे.

यापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून डॉ. विखेंनी सर्वाधिक लोकप्रिय नेत्याचा बहुमान पटकावला आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात ओबीसी समाजाचे नेतृत्व केले. पाथर्डी तालुका स्व. मुंडेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्व. मुंडेंनंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवले. डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ना. मुंडे यांनी प्रथमच प्रचाराच्या दोन सभा घेतल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची पाथर्डी येथे सांगता सभा घेऊन ओबीसी समाजाला आकर्षित करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. उलट राष्ट्रवादीने दिलेली एकीची आरोळी ओबीसी समाजाला एकसंघ करण्यास कारणीभूत ठरली. कधी नव्हे तो ओबीसी घटक एकत्रित आलेला पाहावयास मिळाला. पाथर्डी तालुक्‍यातील पूर्व भागात राष्ट्रवादीला एजंट मिळाले नाहीत.ओबीसी एकसंघ भाजपबरोबर आल्याने विखे यांच्या मताधिक्‍य अनपेक्षितपणे वाढ होऊन ना. पंकजा मुंडे यांचा बालेकिल्लाला अधिक भक्कम झाला आहे.

आ. राजळे यांनीही विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेले अथक परिश्रम फळाला आले आहेत. फार डावपेचात न अडकता सरळ मार्गी राजकारण करणाऱ्या राजळे यांची भूमिका सुरुवातीला त्यांच्याच काही कार्यकर्त्यांच्या पचनी पडली नाही. मात्र नेतृत्वाचा आदेश मान्य करून सर्वांनीच अंग झटकून विखेंना साथ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी प्रयत्न करणारा सर्वसामान्य वर्ग निवडणूक प्रक्रियेत तगमग करताना पाहावयास मिळाला. थेट खात्यावर वर्ग होणारे अनुदान, प्रशासनातील मोदींची पारदर्शक भूमिका, कॉंग्रेस काळातील भ्रष्टाचार, मोदी सरकारने पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राइक, शेतकऱ्यांसाठीची पेन्शन योजना, शासकीय कर्मचाऱ्यापेक्षा ऑनलाइन प्रक्रिया बरी असे अनेक मुद्दे सांगत सर्वसामान्य शेतकरीही मोदीच्या बाजूने उभे ठाकले होते. पक्षीय प्रचार प्रक्रियेपासून दूर राहत या वर्गाने फक्त मोदींकडे पाहून भाजपला मतदान केले.

या सर्वांना जोड मिळाली विखे परिवाराच्या करिष्म्याची.पक्षापेक्षा व्यक्तीनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब विखे यांनी सर्वपक्षीय जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून या परिसरात समाजकार्य केले. ओबीसीचे नेते अशी ओळख स्वर्गीय विखेंना या जिल्हा विकास आघाडीने दिली. विविध जाती धर्माचे मित्रमंडळी या आघाडीच्या तंबूत राजकीय डावपेच शिकले. राजकारणात फक्त निष्ठा हवी हा मंत्र घेऊन गेली. अनेक वर्ष विखे परिवाराबरोबर काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांना माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीगाठीने सक्रिय केले. पक्षविरहित या शक्तीचाही डॉ. विखे यांना मोठा लाभ झाला. गेले तीन वर्ष डॉ. विखे यांनी जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेत सर्वसामान्यांना मदतीचा हात देऊन आपलेसे केले.

लोकसभा लढविण्याच्या इराद्यानेच रिंगणात उतरलेल्या विखेंना माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाठ, माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, अजय रक्ताटे, मोहनराव पालवे, काशिनाथ लवांडे, प्रतिक खेडकर, माजी नगरसेवक रामनाथ बंग अशा विश्‍वासू कार्यकर्त्यांची सुरुवातीपासूनच साथ मिळाली. पाथर्डी शहरातून मताधिक्‍य देण्यासाठी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी जिवाचे रान केले. शहरातून सुमारे पाच हजाराचे मताधिक्‍य विखेंना मिळाले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच ना. पंकजा मुंडे यांची जाहीर सभा घेऊन जुने नवे भाजप कार्यकर्ते, राजळे समर्थक, गांधी समर्थक, विखे समर्थक या सर्वांची एकत्रीत मोट बांधण्यास डॉ. विखे यांनी प्रथम प्राधान्य दिले.गटबाजी दूर करूनच विखे निवडणूक प्रचाराला लागले. शेवगाव तालुक्‍यात जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे ऐनवेळी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आल्या. पाथर्डीत ऍड. प्रताप ढाकणे तर शेवगाव तालुक्‍यात काकडे बरोबर घुले बंधूंनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली. विधानसभेला काकडे, घुले की ढाकणे अशीही चर्चा या निवडणूकीत रंगली. झुंज लावलेले राष्ट्रवादीचे नेते मतदारांना फारसा विश्‍वास देऊ शकले नाहीत. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचलेल्या विखेंच्या यंत्रने समोर राष्ट्रवादीची यंत्रणा तोकडी पडली.

गावागावातील स्वपक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबरच विरोधी कार्यकर्त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून विखे यंत्रणेने पेस्ट कंट्रोलची महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षांतर्गत विरोधकांवर यंत्रणेमुळे अंकुश राहिला. गावागावात निर्माण झालेल्या पूरक परिस्थितीचा अभ्यास करून विखेप्रेमात पडलेला मतदार मतपेटीपर्यंत जाईपर्यंत ठाम ठेवण्याचे काम केले. डॉ. विखे यांना मिळालेले सर्वाधिक मताधिक्‍यात विखे यंत्रणेचा मोलाचा सहभाग नाकारता येणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.