पुणे पालिकेत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

भविष्य निर्वाह निधी न मिळाल्याने उचलले पाऊल


आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीने महिला होती कामाला

पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीने कामाला असलेल्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आरोग्य विभागातच आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेने आरोग्य विभाग प्रमुखांच्या दालनाबाहेरील गॅलरीतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे आरोग्य विभागात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने या महिलेस अडविले. तसेच, या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या महिलेचे नाव समजू शकले नाही.

ही महिला कर्मचारी महापालिकेकडे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत ठेकेदारी पध्दतीने कार्यरत होती. मात्र, काही घरगुती अडचणीस्तव त्यांनी हे काम सोडले होते. त्यानंतर या महिने आपला भविष्य निर्वाह निधी मिळावा म्हणून महापालिकेकडे तसेच ठेकेदाराकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर पालिकेकडून हा प्रस्तावही भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही या महिलेस गेल्या काही महिन्यांपासून हे पैसे मिळालेले नाहीत. तसेच, या महिलेस महापालिकेचे अनुभव प्रमाणपत्रही हवे होते. मात्र, ही महिला गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागात आल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून तिला प्रतिसाद दिला जात नव्हता. तसेच, नेमकी माहितीही दिली जात नव्हती. त्यातच, ही महिला शुक्रवारी आली असताना, या अभियानाचे काम पाहणाऱ्या सहायक आरोग्य प्रमुखांशी तिचा वाद झाला. त्यामुळे ही संतापलेली महिला आरोग्य विभागातच आराडाओरड करत आपण आत्महत्याच करणार असल्याचे सांगत गॅलरीच्या दिशेने गेली. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी तिला अडविले यावेळी या महिलेने आपण आरोग्य विभागास कंटाळून आत्महत्या करत असल्याचे 100 नंबरवर पोलिसांना कळविले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने एक सहायक पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचारी आरोग्य विभागात दाखल झाल्या. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य प्रमुखही बैठक सोडून आपल्या कार्यालयात आले. तसेच, या महिलेची तक्रार समजून घेत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच, पुढील सात दिवसांत हे प्रकरण मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या महिलेची माहिती घेऊन तसेच चौकशी करून तिला सोडून दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)