Kalyan Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीतील काही मतदार संघातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडूनच तीव्र विरोध करण्यात आला होता. यातच शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे शिवसेना पक्ष नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उमेदवारी जाहीर करणे अपेक्षित असताना ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आली. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे. कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते, अशी टीका सावंत यांनी केली आहे.
सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये काय म्हंटले आहे ? Kalyan Lok Sabha Election 2024|
सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “महायुतीची महाशक्ती भाजपा आहे, यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजपा घेताना दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणाऱ्या कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालते आहे हे स्पष्ट आहे, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे.
महायुती ची महाशक्ती भाजपा आहे यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजपा घेताना दिसते. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 6, 2024
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ? Kalyan Lok Sabha Election 2024|
नागपूरमध्ये भाजपच्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना कल्याणच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील, हे स्पष्ट केले. भाजपकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला कोणताही विरोध नाही.
श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. पूर्ण ताकदीने आणि गेल्यावेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून आम्ही निवडून आणू. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासपा ही महायुती त्यांना निवडून आणेल, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे महायुतीचा कल्याणमधील तिढा संपल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा: