मायणी – मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने माजी केंद्रीय कृषी शरद पवार यांचा सत्कार करण्यात येणार असून त्यासाठी शदर पवार आज बुधवारी मायणी येथे येणार आहेत. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या आवारात उभारण्यात आलेल्या माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या शक्तीस्थळ या ठिकाणी असलेल्या समाधीस व अर्धाकृती पुतळ्यास शरद पवार हे पुष्पहार घालून अभिवादन करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुरेंद्र गुदगे म्हणाले, सत्काराच्या कार्यक्रमानंतर शरद पवार हे मायणी अर्बन बॅंकेस सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर ते पडळ (ता. खटाव) येथे आयोजित खटाव माण ऍग्रो लिमिटेड साखर कारखान्यावर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यावेळी सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे आमदार व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुरेंद्र गुदगे यांनी केले आहे.