बारामती/ जळोची : राष्ट्रवादीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आले आहेत. काकांची साथ सोडून पुतण्याने शिंदे- फडणवीस सरकारमध्ये घरोबा केला. पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार हे गोविंदबागेत रविवार (दि.13) रात्री दाखल झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
शुक्रवारी (दि.12) शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली होती. यावरून राज्याच्या राजकारणात तर्क- वितर्कांना उधाण आले होते. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच बारामतीत येत आहेत.
पक्षफुटीनंतर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार हे बारामतीत रात्री उशिरा दाखल झाले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, मराठा स्वराज्य संघ या संघटनेचे 100 हून अधिक कार्यकर्ते शरद पवार यांना भेटून पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत.
मराठा संघाचे पदाधिकारी येणार
मराठा स्वराज्य संघ या संघटनेने आतापर्यंत मराठा जनजागृती करण्याचे काम केले आहे. आंदोलने, निदर्शने, मोर्चे केले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकदा आंदोलने केले आहेत. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व आहे ते पवार यांच्यामुळेच आहे. आमचा शरद पवारांना पाठिंबा असल्याचे संघटनेकडून स्पष्ट केले आहे. संघटनेतील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे विभागातील पदाधिकारी हे पवारांच्या भेटीसाठी येणार आहेत. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली..