मुंबई : सोलापूरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष मनिष काळजे हे सतत धमकावत असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे काम करणे अवघड झाले असल्याचे असा आरोप याठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबत नर्स संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली आहे. तर दुसरीकडे मनिष काळजे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील नर्स संघटनेने शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्याकडून धमकावले जात असल्याचा नर्स संघटनेकडून आरोप करण्यात आला आहे. मनिष काळजे हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक आहेत. नर्स संघटनेने त्यांच्याविरोधात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांच्यासारखी तुमची अवस्था करेल, असे म्हणत धमकावले जात आहे. तसेच हस्तक्षेप वाढल्यामुळे काम करणे अवघड झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेने केला आहे. तशी लेखी तक्रार या संघनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर राज्यस्तरीय संघटनेशी संपर्क साधून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. तसेच आरोग्य विभागावरील दबावतंत्र जुगारून देण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत, असा इशाराही महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेने दिला आहे. नर्स संघटनांच्या या इशाऱ्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी नर्सेस संघटनेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. नर्सेस संघटनेला पुढे करून भ्रष्टाचारात अडकलेल्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून हे कटकारस्थान रचले जात आहे. माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, अशी प्रतिक्रिया मनिष काळजे यांनी दिली.