चंडीगढ – भाजपची सत्ता असणाऱ्या हरियाणामध्ये मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवरून अस्वस्थता असल्याचे समोर आले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार श्यामसिंह राणा यांनी पक्षाला रामराम ठोकला.
विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारमध्ये राणा यांनी मुख्य संसदीय सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती. शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन भाजपमधून बाहेर पडत असल्याचे राणा यांनी नमूद केले.
कृषी कायद्यांविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी निदर्शने करत आहेत. त्यांना वाटणारी चिंता चुकीची नाही, असेही त्यांनी म्हटले.
याआधी हरियाणातील भाजपच्या काही नेत्यांनी मोदी सरकारच्या कृषीविषयक सुधारणा शेतकरीविरोधी असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली होती. शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीविषयी (एमएसपी) शेतकऱ्यांना वाटणारी चिंता दूर करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
कृषी कायद्यांविरोधात हरियाणात आंदोलन, निदर्शनांचे सत्र सुरू आहे. अशाच एका निदर्शनात जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) दोन आमदार सहभागी झाले. विशेष म्हणजे, जेजेपी हा भाजपच्या नेतृत्वाखालील हरियाणातील सत्तारूढ आघाडीचा घटक आहे.