नेवासे – जनावरांची कत्तल करून त्यांची हाडे भरून ट्रकद्वारे त्यांची वाहतूक करणाऱ्यांना नेवासे पोलिसांनी सापळा रचून खडका फाटा येथे जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) रात्री नऊ वाजता करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासे पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल बाळू सुभाष खेडकर यांना खबऱ्यामार्फत कत्तल केलेल्या जनावरांची हाडे श्रीरामपूरहून औरंगाबादकडे ट्रकमधून घेवून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पो. हे. कॉ. ठोंबरे, पो. कॉ. दहिफळे, पो. कॉ. पवार यांनी नेवासे खुर्द येथील खडका फाट्यावरील औदुंबर हॉटेलजवळ सापळा लावला. यावेळी तेथे एक रंगाचा ट्रक (क्र. एमएच-20 टी-6382) आला.
या ट्रकला आडवून पोलिसांनी चालक इस्माईल इब्राहीम कुरेशी (रा. राजाराय टाकळी, ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) याच्याकडे ट्रकमधून कशाची वाहतूक केली जात आहे, याची विचारणा केली. त्याने श्रीरामपूर येथील प्रभाग क्रमांक दोन मधील कुरेशी मोहल्ला येथील सलीम कुरेशी यांच्याकडून कत्तल केलेल्या जनावरांची हाडे घेवून औरंगाबाद येथील ट्रक मालक हबीब इस्माईल कुरेशी (रा. मिटमिटा, औरंगाबाद) याच्या गोदामात ठेवण्यासाठी जात असल्याचे सांगितले. तसेच याचा परवानाही नसल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यात मृत जनावरांची हाडे आढळून आली. यावेळी नेवासे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब आनंदराव डौले यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले.