हरिद्वार – मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी पुढे करत उत्तराखंडमधील एका ज्येष्ठ नागरिकाने शुक्रवारी आक्रमक पवित्रा स्वीकारला. संबंधित वयोवृद्ध मतदाराने चक्क इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रच (इव्हीएम) जमिनीवर फेकून दिले.
उत्तराखंडमधील हरिद्वारचे रहिवासी रणधीर (वय ७०) मतदानासाठी केंद्रावर पोहचले. मतदानावेळी त्यांनी आरडाओरड करत इव्हीएम उचलून जमिनीवर फेकले. माझा इव्हीएमला विरोध आहे. केवळ मतपत्रिकांच्या माध्यमातूनच निवडणूक घेतली जावी, असे ते म्हणाले.
इव्हीएम फेकल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. काही तासांनंतर त्यांनी सोडण्यात आले. रणधीर यांनी जमिनीवर फेकलेल्या इव्हीएमचे किरकोळ नुकसान झाले. मात्र, ते व्यवस्थित कार्यरत असल्याने बदलण्यात आले नाही.
रणधीर यांच्या आक्रमक कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित असणारे निवडणूक कर्मचारी आणि मतदार काही काळासाठी हबकले. विरोधी पक्ष सातत्याने इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
पुन्हा मतपत्रिकांच्या वापराची आग्रही मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. त्यामुळे इव्हीएमवरून वारंवार राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात.