कोपर्डे हवेली – गेल्या दहा दिवसांपासून पडत असलेल्या सतंतधार पावसाने शामगाव ता. कराड येथील पाझर तलाव भरुन वाहत आहे. या पाण्याचे पूजन करण्यासाठी गेलेल्या शिवाजी पाटील, दत्तात्रय पोळ, दादासो महाडिक या शेतकऱ्यांना तलावाला भेगा पडल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून याची त्वरित दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
शामगावला एकूण तीन पाझर तलाव आहेत. या तलाव्यावर रब्बी पिके घेतली जातात. संततधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी तीनही तलाव पावसाने भरले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे गावातील काही ग्रामस्थ पाणी पूजन करण्यासाठी तलावाच्या ठिकाणी गेले असता त्यांना तलावाला भेगा पडलेल्या निदर्शनास आले. संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना करुन पुढील होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.