नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत असणारे 370 कलम रद्द करणारे विधेयक संसदेत पारित झाल्यानंतर देशभरातून सरकारचे कौतुक होत आहे. त्यात बहुतांश पक्षांनी सरकारच्या या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यातच शिवसेनेकडूनही सरकारला या निर्णयावर पाठिंबा देण्यात आला आहे. यासाठी सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेत आज काश्मीर घेतला आहे, उद्या बलुचिस्तान आणि पीओके घेवू असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे पोस्टर्स पाकिस्तानमध्ये झळकलेले पहायला मिळत आहेत.
संजय राऊत यांनी कलम 370 वर केलेले भाषण संसदेत चांगलेच गाजले आणि त्याचे पडसाद पाकिस्तानात उमटले. आज काश्मीर घेतला आहे, उद्या बलुचिस्तान आणि पीओके घेवू असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. त्यांच्या वक्तव्याचा इस्लामाबादेत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जागोजागी संजय राऊत यांचे पोस्टर्सही लावण्यात आले. या पोस्टर्समध्ये महाभारत स्टेप फॉरवर्ड असे शिर्षक देण्यात आले असून त्याखाली संजय राऊतांचे संसदेतील विधान छापण्यात आले आहे. या पोस्टर्सवर पाकिस्तानात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एक देश म्हणून आपण कुठे जात आहोत, आमच्या देशात, आमच्या शहरात आमच्या डोळ्यासमोर भारतीय लोक असे पोस्टर्स लावत आहेत आणि आमचे लोक झोपले आहेत, जिथवर आमची नजर जाईल तिथवर हे पोस्टर्स लावण्यात आले असल्याच्या प्रतिक्रिया पाकमध्ये उमटत आहेत.