पुणे – करोना या विषाणूपासून सर्व कर्मचारी सुरक्षित रहावे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्व स्तरावर मेट्रोतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. मेट्रो कर्मचाऱ्यांना निरोगी वातावरण मिळावे यासाठी महामेट्रो सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांच्यातर्फे कळवण्यात आले आहे.
लेबर कॅम्प या ठिकाणी कामगारांसाठी आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. कामगारांची संख्या जास्त आहे अशा सर्व कास्टिंग यार्डांवर बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. कास्टिंग यार्डमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींचे त्यांच्या शरीराचे तापमान तपासले जात आहे आणि कामाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना सॅनिटायझर्स आणि मास्क पुरवले जात आहेत.
याशिवाय या विषाणूच्या बाबतीत सर्व घ्यावयाची काळजी, माहिती सर्व कार्यालये आणि बांधकाम साइट्सवर आयोजित जागरूकता कार्यक्रमांद्वारे सर्वांना स्पष्ट केली जात आहे. तसेच डॉक्टर आणि पॅरामेडिक्स हे काय करावे आणि काय करू नये, या गोष्टींवर प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी त्यांना उद्युक्त करत आहेत. तसेच नियमितपणे कर्मचाऱ्यांची तपासणीही केली जात आहे. सर्व कार्यालये, साइट्स येथे सर्व समारंभ बंद करण्यात आले आहे.
महामेट्रोचे कामगार डेक्कन महाविद्यालय ग्राउंड, नाशिक फाटा, किवळे, वाघोली, कृषी महाविद्यालय आणि वनाज येथील लेबर कॅम्प मध्ये राहत असून त्यांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. या सर्व ठिकाणी 247 तज्ज्ञ डॉक्टरांची सोय करण्यात आली आहे, असे महामेट्रो प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.